परीक्षा घ्यायच्या किंवा कसे, याबाबत लवकरच निर्णय; आरोग्य विभागात क, ड दर्जाची पदे भरणार : आरोग्यमंत्री टोपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ डिसेंबर । राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. यासाठी अधिकाऱ्यांपासून ते सर्व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. आतापर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८,३३५ पैकी ७,९८१ पदे भरली आहेत. ३,३५७ पैकी २,६११ तज्ज्ञ डाॅक्टर्सची नियुक्ती केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांची एमपीएससीकडे यादी सादर केली आहे. क व ड वर्गातील १०० टक्के पदे भरण्यात येतील, मग परीक्षा घ्यायच्या किंवा कसे, याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. सदस्य सुधीर तांबे, भाई जगताप, जयंत आसगावकर आदी सदस्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवेकडे झालेले दुर्लक्ष याकडे लक्षवेधीद्वारे लक्ष वेधले.

अपूर्ण बांधकामे, तपासणी यंत्रे, डॉक्टर, कर्मचारी यांची रिक्त पदे, पुरेशा अम्ब्युलन्स नसणे यामुळे आरोग्य सेवेची दुरावस्था झाली आहे. यावर आरोग्यमंत्री टोपे यांनी उत्तर दिले. राज्यातील उपजिल्हा रूग्णालयात सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठ हुडकोकडून ४ हजार कोटी तर एशियन बँकेकडूनही कर्ज घेण्यात येणार आहे. डायलेसिस, सोनोग्राफी, यंत्र खरेदी, अपूर्ण इमारत व इतर सुविधेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयांत सीटी स्कॅन
जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांत सीटी स्कॅन, एमआरआय व सोनोग्राफी मशीन महिनाभरात देण्यात येणार आहे. खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. किमोथेरपी, रेडिशनसह कर्करोग तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्यातील १०० टक्के नागरिकांना विमा दिला आहे. १०० टक्के विमा सुविधा राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे टोपे यांनी सांगितले. सदस्य गिरीश व्यास, रणजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link