100 कोटी वसुली प्रकरण:ईडीच्या 7 हजार पानी आरोपपत्रात अनिल देशमुखांसह 2 मुलांची नावे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० डिसेंबर । भ्रष्टाचार आणि अवैध मार्गाने पैसा गोळा केल्याच्या आरोपांप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात पीएमएलए न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केले. या आरोपपत्रात देशमुख यांच्यासोबतच त्यांच्या दोन मुलांनाही सहआरोपी करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सादर केलेले आरोपपत्र ७ हजार पानांचे आहे. प्रमुख आरोपी म्हणून अनिल देशमुख, तर त्यांची मुले हृषिकेश आणि सलील यांचीही सहआरोपी म्हणून नावे आहेत.

अनिल देशमुख २ नोव्हेंबरला अचानक ईडीसमोर आले. ईडीने त्यांची सात तासांहून अधिक काळ चौकशी केली आणि त्यांना अटक केली. देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहायक कुंदन शिंदे यांच्याविरोधात ऑगस्ट महिन्यात पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मुंबईतील बार आणि हुक्का पार्लरकडून खंडणी गोळा करून बडतर्फ सहायक निरीक्षक सचिन वाझेने अनिल देशमुखांना ४.७ कोटी रुपये दिल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना आढळले.

या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेचा जबाब दोनदा नोंदवला. अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआय एफआयआरनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी मुंबईत खंडणी म्हणून महिन्याला १०० कोटी रुपये उकळण्यास सांगितले होते असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनीच उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केला होता.

मंत्री, निवृत्त सचिवांसह १२ पोलिस अधिकाऱ्यांचे जबाब
या प्रकरणात १२ पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्राचे परिवहनमंत्री अनिल परब आणि निवृत्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचाही याप्रकरणी जबाब नोंदवण्यात आलेला आहे. सध्या देशमुख मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांच्यावर पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *