2022 मध्ये होणार 3 वर्ल्ड कप, भारत-पाकिस्तान 4 वेळा आमने-सामने

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ जानेवारी । क्रिकेट फॅन्ससाठी 2022 मध्ये भरगच्च मेजवानी आहे. या वर्षात एकूण 3 वर्ल्ड कप (ICC World Cup) स्पर्धा होणार आहेत. मागील वर्षी झालेल्या दोन आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाला विजेतेपदानं हुलकावणी दिली होती. यावर्षी या अपयशाची परतफेड करण्याची संधी टीम इंडियाला (Team India) आहे. त्याचबरोबर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील महामुकाबल्याचा थरार या वर्षात किमान 4 वेळा अनुभवता येणार आहे.

सर्वात प्रथम वेस्ट इंडिजमध्ये 14 जानेवारीपासून अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा (2022 Under 19 World Cup) सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 टीम सहभागी होतील. सर्व टीमची विभागणी 4 गटांमध्ये करण्यात आली आहे. भारतीय टीमचा ग्रुप B मध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये आयर्लंड, युंगाडा आणि दक्षिण आफ्रिका या अन्य टीम आहेत. प्रत्येक ग्रुपमधील टॉप 2 टीम क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करतील. या स्पर्धेत पाकिस्तानचा समावेश ग्रुप C मध्ये अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वेसह करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान नॉक आऊट लढतील एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता आहे.

महिलांचा वन-डे वर्ल्ड कप (2022 Womens World Cup) देखील यावर्षी होत आहे. कोरोनामुळे ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. न्यूझीलंडमध्ये 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान हा वर्ल्ड कप होईल. या वर्ल्ड कपमध्ये 8 टीम सहभागी होणार आहेत. सर्व टीमना एकमेकांच्या विरुद्ध एक लढत खेळायची आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात लीग राऊंडमध्ये एक लढत होणार आहे. त्याचबरोबर दोन्ही टीम नॉक आऊट राऊंडमध्ये गेल्या तर तिथंही त्यांच्यात सामना होऊ शकतो.

टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) स्पर्धा यावर्षी ऑस्ट्रेलियात होणार आहे. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 16 टीम सहभागी होणार असून 45 सामने होतील. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम यामध्ये खेळणार आहेत. या वर्ल्ड कपचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही. पण, लीग किंवा नॉक आऊट राऊंडमध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळू शकतात. 2021 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) झालेल्या दोन्ही देशांच्या लढतीत पाकिस्ताननं विजय मिळवला होता. त्याचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *