महाराष्ट्रात कसा दाखल झाला कोरोना व्हायरस? कोरोना व्हाया दुबई महाराष्ट्रात

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन :मुंबई : राज्यात सर्वप्रथम धुळवडीच्या दिवशी म्हणजेच 10 मार्चला पुण्यात 2 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांच्यावर तातडीने पुण्याच्या नायडू रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. कोरोना व्हायरस आता राज्यभर पसरणार याची शक्यता या रुग्णांच्या चौकशीतून समोर आली.

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्रात सर्वप्रथम आढळलेले पुण्याचे 2 रुग्ण हे दुबईहून आले होते. 40 जणांच्या समूहासोबत हे दोघे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुबईला फिरण्यासाठी गेले होते. महत्त्वाचं म्हणजे या 40 पैकी 37 जण हे महाराष्ट्रातले नागरिक आहेत, तर 3 जण कर्नाटकातले. 1 मार्चला हे 37 जण मुंबई विमानतळावर उतरले. पुण्यातील दोघं मुंबईहून खासगी टॅक्सीने पुण्यात आले. 8 मार्चला या दोघांपैकी एकाला अचानक त्रास होऊ लागला. त्यानंतर कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली, ज्यात दोघं कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या दोघांचे कुटुंबीय आणि मुंबईतला टॅक्सीचालक अशा सगळ्यांनाच कोरोनाची लागण झाली.” आरोग्य विभागाचे जनसंपर्क अधिकारी एन. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 39 कोरोना रुग्णांपैकी 12 जण दुबईहून परतलेल्या त्या समुहातले आहे. तर 5 जण लागण झालेल्यांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाबाधीत झालेत.

महाराष्ट्रात व्हाया दुबई आलेल्या या कोरोना व्हायरसचा तिढा पुण्यापर्यंतच थांबला नाही. तर दुबईहून आलेले उर्वरित 35 जण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील असल्यानं अशा सगळ्यांचा शोध प्रशासनाला घ्यावा लागला. या सगळ्या जणांचा शोध घेणं प्रशासनासाठी क्रमप्राप्त झालं आणि त्यासाठी वेळही लागला. तोपर्यंत हे सगळे जण राज्यातील अनेकांच्या संपर्कात आले.

जिल्हा प्रशासनानं अशा सगळ्यांचा शोध घेत त्यांची कोरोना चाचणी केली. तसंच त्यांच्या निकटवर्तीयांचीही तपासणी करण्यात आली. कोरोना व्हायरसचा पुढचा रुग्ण आढळला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या 2 रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 5 रुग्ण आढळले. ज्यामुळे मुंबई, पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली. यात 1 रुग्ण थायलंडहून परतला होता. शुक्रवारपर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 19 इतकी होती. पण लगेचच एका दिवसात राज्यात 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *