महाराष्ट्र २४ ऑनलाईन ; पुणे – कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे राज्यातील सर्वाधिक रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आहेत. राज्यात गुरुवारपर्यंत कोरोनाचे 48 रुग्ण आढळले असून, त्यापैकी 11 रुग्ण पिंपरी चिंचवडमधील आहेत. पुण्यात आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.
राज्यात गुरुवारी 78 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. बाधित भागातून राज्यात एक हजार 305 प्रवासी आले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत एक हजार 36 जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 971 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर 48 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन, त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्यांपैकी 442 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
तीन “पॉझिटिव्ह’
आज राज्यात आणखी चार कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 48 झाली आहे. नगर जिल्ह्यातील 51 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळला असून, तो पत्नीसह दुबईला गेला होता. त्याची पत्नी “निगेटिव्ह’ आढळली आहे. मुंबई येथेही दुबईवरून आलेल्या 22 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) केले. तसेच, उल्हासनगर येथील महिलेचा अहवाल “पॉझिटिव्ह’ आल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.
जिल्हा / मनपा ………………………. बाधित रुग्ण
पिंपरी चिंचवड ………………….. 11
पुणे ……………………………. 8
मुंबई …………………………………. 9
नागपूर …………………………………. 4
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी …. 3
नगर …………………………………….. 2
रायगड, ठाणे, औरंगाबाद, रत्नागिरी, उल्हासनगर प्रत्येक 1