IND vs SA : ऋषभ पंत तिसऱ्या कसोटीतून बाहेर?; साहाच्या पोस्टमुळे उडाली खळबळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ जानेवारी । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाच्या एका नवीन पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. साहाने ट्विटरवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात तो मंगळवारपासून केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी न्यूलँड्स स्टेडियममध्ये उभा दिसत आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये, ‘हॅलो केपटाऊन’ असे म्हटले आहे. या पोस्टमुळे साहाला तिसऱ्या कसोटीत ऋषभ पंतच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

साहाने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तो बॅट घेऊन सराव करताना दिसत आहे. त्याच्या या पोस्टमुळे साहा खरोखर तिसरी कसोटी खेळणार असल्याचे अनेकांना वाटू लागले आहे. चाहत्यांना पंतच्या जागी साहा खेळण्याची खात्री आहे कारण भारतीय संघाच्या सरावाच्या आतापर्यंत बीसीसीआयने पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये पंत कुठेही दिसत नाही. यावेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात साहाने नेटवर किंवा मैदानावर सराव करतानाचे कोणतेही छायाचित्र शेअर केले नव्हते. त्यानंतर साहाने प्रशिक्षणाची छायाचित्रे पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दुसऱ्या कसोटीत पराभव झाल्यानंतर पंतच्या बेजबाबदार शॉटवर बरीच टीका होत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील दुसऱ्या कसोटीत पंतच्या खराब शॉटमुळे खूप नाराज होते. द्रविडने पत्रकार परिषदेत पंतच्या शॉटची निवड योग्य नसल्याचे सांगितले होते. तो संघात त्याच्या किपिंग कौशल्यापेक्षा त्याच्या फलंदाजीसाठी आहे पण अलीकडच्या काळात त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत. दक्षिण आफ्रिका मालिकेतील त्याच्या ८, ३४, १७ आणि ० अशा धावा आहे. त्याचवेळी साहाने कानपूर कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक केल्याने भारतासाठी एक नवा पर्याय म्हणून समोर आला आहे.

दरम्यान, दुखापतीमुळे सामन्याला मुकावे लागल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मंगळवारपासून सुरू होणाऱ्या निर्णायक तिसऱ्या कसोटी क्रिकेट लढतीत दमदार कामगिरी करून मालिकेत २-१ असे ऐतिहासिक यश संपादन करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.

विहारीला डच्चू; श्रेयसची प्रतीक्षा कायम

कोहली परतल्याने हनुमा विहारीला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. दुसऱ्या कसोटीत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही अनुभवी फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी अर्धशतके झळकावून संघातील स्थान टिकवले. त्यामुळे मुंबईकर श्रेयस अय्यरला आफ्रिकेत पहिली कसोटी खेळण्यासाठी पुढील दौऱ्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते. उपकर्णधार के. एल. राहुल (दोन सामन्यांत २०४ धावा) सलामीला छाप पाडत असला तरी मयांक अगरवाल आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत यांना कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *