cold wave | विदर्भात पाऊस, गारपीट आणि नुकसान; थंडीची लाट आजही कायम?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ जानेवारी । हवामान खात्याचा इशारा खरा ठरवत गेल्या तीन-चार दिवसांपासून विदर्भात (Vidarbha) अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यात लिंबाच्या आकाराएवढ्या गारा पडल्या. त्यामुळं भाजीपाला आणि फळांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सावनेर, कामठी, पारशिवनी तालुक्यात मंगळवारी दुपारी गारांसह मुसळधार पाऊस पडला. दोन तास कोसळलेल्या या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक गावांमध्ये बोर आणि लिंबाच्या आकाराएवढ्या गारा पडल्या. संत्रा, मोसंबी या फळांना गारांचा फटका बसला. तर भाजीपाल्याचेही प्रचंड नुकसान झाले. सावनेर तालुक्यातील दहेगाव, वलनी, सिल्लेवाडा, चनकापूर, पिपळा रोहना ही गावे तसेच कन्हान नदीकाठच्या गावांना गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला.

कामठी तालुक्यातील कोराडी, नांदा, महादुला ही गावे तसेच पारशिवनी तालुक्यात गारांसह पाऊस पडला. या गावांमधील फळभाज्यांसह कापणीला आलेला तूर, कापूस, गहू, हरभरा या रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. अधूनमधून पाऊस येत आहे. नागपूर शहरातील रस्ते जलमय झाले. पण सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला. लोणखैरी, खापा, गुमठा, चिचोली ही गावेही गारपिटीच्या तडाख्यात सापडली. या गावांमध्येही मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाल्याचे बाजार समितीचे माजी संचालक हुकूमचंद आमधरे यांनी सांगितले.

गारपिटीमुळे सावनेर तालुक्यातील चनकापूर, सिल्लेवाडा, दहेगाव (रंगारी), वलनी, रोहणा आणि पिपळा (डाक बंगला) तसेच कन्हान नदीकाठची काही गावे, कामठी तालुक्यातील कोराडी, महादुला, नांदा तसेच पारशिवनी तालुक्यातील दहेगाव (जोशी) सह परिसरातील गावांमधील संत्रा व मोसंबी तसेच कापणीला आलेली तूर, कपाशी, गहू, हरभरा, टोमॅटो यासह अन्य भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोमवारपाठोपाठ मंगळवारीदेखील पावसाने शहरात हजेरी लावली. परंतु, मंगळवारी शहरात चांगलाच पाऊस बरसल्याने वातावरणातील गारठाही वाढला. आणखी दोन दिवस जिल्ह्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील वातावरणात बदल दिसून येत आहे. नागपूर आणि विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरातील ग्रामीण भागात तसेच विदर्भात सोमवार आणि मंगळवारी वादळी पावसासह गारपीट झाली. यात मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *