वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा, सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ जानेवारी । फलटण तालुक्यातील साठे फाटा येथे वडिलांच्या डोक्यावर, तोंडावर फरशीच्या तुकडय़ाने हल्ला चढवून त्यांचा खून केल्याप्रकरणी मुलाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठाविली. दरम्यान, 2018 साली ही घटना घडल्यावर सुरुवातीला ‘हाफ मर्डर’चा, तर मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

नारायण भिकू इंगळे असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. श्यामसुंदर नारायण इंगळे (रा. साठेफाटा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विजय रामचंद्र इंगळे यांनी फलटण ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली होती. 30 मे 2018 रोजी ही घटना घडली आहे.

स्टोव्हचा पंप सापडत नसल्याने श्यामसुंदर याने वडील नारायण इंगळे यांच्याशी वाद घातला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, संतप्त झालेल्या मुलाने वडिलांवर फरशीच्या तुकडय़ाने हल्ला चढविला. या हल्ल्यात फरशीचा डोक्यावर, कपाळावर व कानावर वर्मी घाव बसल्याने नारायण इंगळे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारांसाठी दाखल केल्यानंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या सर्व प्रकरणाचा तपास फलटण ग्रामीणचे फौजदार आर. आर. भोळ यांनी करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. मिलिंद ओक यांनी युक्तिवाद करीत सहा साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी श्यामसुंदर याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठाविली. प्रॉसिक्युशन स्क्वाडच्या हवालदार ऊर्मिला घार्गे, शमशुद्दीन शेख, सुधीर खुडे, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *