Maharashtra Government : सर्वच दुकाने, कार्यालयांना मराठी पाट्या बंधनकारक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ जानेवारी । राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले असून, 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने, आस्थापनांनाही ही मराठी पाट्यांची सक्ती लागू करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी हा निर्णय घेतला. (Maharashtra Government)

या निर्णयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाट्यांवर मराठीतील म्हणजे देवनागरी लिपीतील अक्षरे इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही भाषेतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत.

राज्यात खासकरून मुंबई, ठाणे, पुण्यासह प्रमुख शहरांत अनेक दुकानदार, आस्थापना या मराठी भाषेऐवजी इंग्रजी भाषेतील पाट्या लावतात. मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा असताना हा प्रकार सर्रास सुरू असणे म्हणजे मराठी अस्मितेची गळचेपी असल्याचा सूर महाराष्ट्रातून सतत उमटत आला. त्याची दखल घेत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा-शर्तींचे विनियमन) अधिनियम 2017 हा कायदा आणण्यात आला.

मात्र, हा कायदा करताना दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापना, दुकानांनाच मराठी पाट्यांची सक्ती करण्यात आली होती. परंतु, राज्यातील 90 टक्के दुकाने, आस्थापनांत दहापेक्षा कमी कामगार

आहेत. ही बहुसंख्य दुकाने कायद्यातील पळवाट शोधून सर्रास इंग्रजी पाट्या झळकावत आली. शिवाय, काही दुकानदारांनी इंग्रजी अथवा दुसर्‍या भाषेतील अक्षरे मोठी, तर मराठी भाषेतील अक्षरे लहान काढल्याचेही निदर्शनास आले.

या तक्रारी सतत येत राहिल्याने शेवटी कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. यासंदर्भातील कायदा दुरुस्ती विधेयक आगामी अधिवेशनात मांडले जाईल, अशी माहिती राज्याचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

ज्या दुकानात कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा दुकानास, बारला महापुरुष/महनीय महिलांची किंवा गड-किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

आता मोठ्यांप्रमाणेच छोट्या दुकानांनाही पाट्या मराठीत कराव्या लागतील.

बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यावरील सर्वच दुकानांवरील पाट्या मराठीत दिसतील.

पाटीवर आधी मराठी भाषेत दुकान, कार्यालयाचे नाव लिहिणे आवश्यक आहे.

मराठी अक्षरे इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही भाषेतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *