महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ जानेवारी । राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शाळा सुरु (School Reopen) करण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्याच्या कॅबिनेटमध्ये शाळा सुरु करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय कोरोना केसेस (Corona Cases) कमी असतील त्या ठिकाणी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, अशी चर्चा झाली होती. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून 40 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. त्यामुळं शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोना रुग्णसंख्या आणि सद्यस्थिती पाहता शाळांबाबत घेतलेल्या निर्णयचा फेरविचार करता येईल. शाळांबद्दल आठ पंधरा दिवसात निर्णय घेण्यात येईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील पालकांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं सांगितलं. मात्र, शाळा सुरु करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
राज्यात कोरोना काळात कायमस्वरूपी शाळा बंदचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहोत. पुढील आठवडा भरात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. येत्या दहा पंधरा दिवसात पुन्हा शाळा सुरु करण्याची स्थिती असेल तर आढावा घेऊन निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी असेल, तिथं शाळा सुरु करण्यासंदर्भात येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले.
कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळं पालकांमध्ये शाळा सुरू करण्याविषयी दोन मतप्रवाह आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील पालकांमध्ये शाळा सुरु करण्यासंदर्भात दोन प्रवाह आहेत, अशी माहिती दिली. मात्र, आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊन येणाऱ्या कॅबिनेट मध्ये योग्य निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले.
कोरोना बाधित जे रुग्ण घरी उपचार घेत आहेत त्या रुग्णांवर लक्ष आहे. सध्याच्या सक्रीय रुग्णांपैकी 87 टक्के जण घरी आहेत. आजार वाढला तर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी स्थानिक यंत्रणेवर आहे. होम क्वारंटाईनसंदर्भातील सूचना जिल्ह्याच्या प्रशासनाला दिल्या आहेत, असं राजेश टोपे म्हणाले. क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा असून आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहोत, असं राजेश टोपे म्हणाले. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांनी कोरोना किट संदर्भात निर्णय घ्यावा, असं राजेश टोपे म्हणाले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली ते औरंगाबादेत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आले होते.