महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण चांगलेच तापले आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याचे सांगण्यात येत आहे. ते गोरखपूर मतदार संघामधून निवडणूक लढवणार आहेत. यावरून योगी आदित्यनाथ यांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत चंद्रशेखर आणि योगी यांच्यात येत्या निवडणुकीत रंजक लढत पाहायला मिळू शकते. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
गोरखपूर मतदार संघामधून 2017 मध्ये भाजपचे राधामोहन दास अग्रवाल 60 हजारांच्या फरकाने विजयी झाले होते. ही जागा 1989 पासून भाजपकडे आहे. याआधी चंद्रशेखर सपासोबत युती करण्यासाठी गेले होते. मात्र नंतर त्यांनी समाजवादी पक्षासोबतच्या युतीतून माघार घेतली.
अखिलेश यादव यांना दलित मतांची गरज नाही, त्यामुळे सपा आणि आझाद समाज पक्ष यांच्यात युती होणार नाही, असे चंद्रशेखर आझाद म्हणाले होते. ते म्हणाले होते की, “आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू आणि ज्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर आंदोलन केले, लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, अशा लोकांना नव्या लोकांना संधी देण्याचे आवाहन करणार आहे.”