![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ जानेवारी । पश्चिमी चक्रवातामुळे ईशान्येकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे राज्यात थंडीचे वातावरण राहणार आहे. वातावरणात झालेल्या छाेट्या बदलामुळे कोकण विभागात येत्या २२ ते २४ जानेवारीदरम्यान ठराविक ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी जळगावमध्ये किमान (९.७ अंश) तर मालेगावात (२९.० अंश) कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. २५ जानेवारीपासून पुन्हा थंडीचा कडाका जाणवणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.
अफगाणिस्तानातून येणाऱ्या पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतात थंडी पसरली आहे. त्यामुळे ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात किमान तापमानात घट झाली आहे. स्वच्छ आणि निरभ्र आकाशामुळे सूर्यप्रकाश वाढल्याने कमाल तापमान वाढले आहे. मात्र, कोकणात येत्या २२ ते २४ जानेवारीदरम्यान ठराविक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील.