तिसऱ्या टप्यात न जाण्यासाठी आपल्याला उपाययोजनांची गती वाढवावी; उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे विनंती

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन : मुंबई ; कोरोनाच्या साथीच्या रोगाचा महाराष्ट्र जोमाने मुकाबला करीत आहे. सध्या या रोगाच्या दुसऱ्या टप्यातील संक्रमण अवस्थेत आपण आहोत. तिसऱ्या टप्यात न जाण्यासाठी आपल्याला उपाययोजनांची गती वाढवावी लागेल, विशेषत: चाचणी केंद्रे आणि प्रयोगशाळा यांच्या सध्याच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी आज देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा बोलण्याची संधी देण्यात आली होती. पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. महाराष्ट्र शासनाने देखील वेळीच पावले उचलून कोरोनाचे संक्रमण अधिक वाढू नये यासाठी प्रयत्न केले आहेत. रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी या रोगाच्या फैलावाचे स्वरूप पाहता भ्रमात राहण्यात अर्थ नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तातडीने उपाय शोधण्याची गरज
आंतरराष्ट्रीय विमाने 22 मार्च पासून बंद करण्यात येणार आहेत. तोपर्यंत 20 ते 25 हजार प्रवासी देशात-राज्यात परततील. या प्रवाशांचे क्वारंटाइन करावे लागेल किंवा त्यांच्यावर उपचार करावे लागतील. त्यादृष्टीने सुविधा वाढविण्याची गरज आहे. मुंबई-पुणे-नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उतरलेले परदेशातून आलेले प्रवासी मिळेल त्या वाहनांनी आपापल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतील, त्यांना रोखण्याचे आव्हान आपल्यासमोर असेल. यावर उपाय शोधण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे या वेळी म्हणाले.

प्रसंगी लष्कराची मदत घ्यावी…
आजच्या घडीला सर्व वैद्यकीय सुविधा राज्यात उपलब्ध आहेत. परंतु पुढील काळात क्वारंटाइनसाठी जादा सुविधा लागतील. औषधे, व्हेंटिलेटर, उपचारांसाठी आणखी रुग्णालयांची गरज भासेल. यासाठी लष्करी रुग्णालयांची प्रसंगी मदत घ्यावी लागेल, याविषयी उपाययोजना करण्याची विनंती ठाकरे यांनी मोदींकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *