Bhaiyyu Maharaj Case : भय्यू महाराज प्रकरणातील दोषींना वर्षोनुवर्ष कारावासाची शिक्षा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ जानेवारी । दिवंगत अध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी (Bhaiyyu maharaj suicide case) आज इंदौर येथील सेशन्स कोर्टात (Indore Session Court) अंतिम सुनावणी झाली. कोर्टाने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि ड्रायव्हर शरद यांना दोषी ठरवलं आहे. या दोघांसोबतच पलक नावाच्या महिलेला देखील दोषी ठरवण्यात आलं आहे. या पलकने भय्यू महाराजांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अश्लील व्हिडीओ बनवले होते, अशी देखील माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. अखेर तीनही आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. कोर्टाने या तीनही दोषींना सहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कारण या तिघांनी भय्यू महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कोर्टात सिद्ध झाला आहे.

या प्रकरणी इंदूरच्या सेशन्स कोर्टात जवळपास साडेतीन वर्षांपासून सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणी सेवादार शरद देशमुख, विनायक दुधाले आणि पलक पुराणिक यांनी पैशांसाठी भय्यू महाराजांना मानिसिकरित्या त्रास दिल्याचं उघड झालं. आरोपी पैशांसाठी भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करायचे हे कोर्टात सिद्ध झालं आहे. ज्या सेवकांवर भय्यू महाराजांचा विश्वास होता, ज्यांच्यावर आपल्या आश्रम, कुटुंबाची जबाबदारी सोपवली होती त्याच सेवकांनी विश्वासघात केला. त्यानंतर पैशांसाठी महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केलं, असं कोर्टात सिद्ध झालं.

याप्रकरणी 19 जानेवारीला सुनावणी झाली होती. ही सुनावणी जवळपास साडेपाच तास सुरु होती. त्यावेळी या प्रकरणाचा निकाल 28 जानेवारीला सुनावला जाईल, असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आज कोर्टात तीनही आरोपींना सहा वर्ष कारवासाची दंडात्मक शिक्षा सुनावण्यात आली.

दिवंगत अध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि शरद यांना अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पलकने भय्यू महाराजांसोबत अश्लील व्हिडीओ बनवले होते. ती या सेवकांच्या मार्फत भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करायची. तसेच तिने भय्यू महाराजांवर लग्नासाठी देखील दबाव केला होता. पण त्यांनी आयुषीसोबत लग्न केलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पलक पुराणिक, विनायक दुधाले आणि शरद देशमुख यांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून भय्यू महाराज यांनी आत्महत्या केली होती. हे तीनही आरोपी महाराजांची संपत्ती हडपण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी त्यांनी मोठं षडयंत्र रचलं होतं. त्याच माध्यमातून त्यांनी भय्यू महाराज आणि पलक यांचे अनेक अश्लील फोटो बनवले होते. तेच फोटो दाखवून भय्यू महाराजांना धमकी दिली जायची. त्यामुळे भय्यू महाराज प्रचंड खचले. अखेर त्यांनी नैराश्यात जावून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

पलक एवढी खतरनाक होती की तिने भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करुन आश्रमच्या तिजोरी आणि दानपेटीवर ताबा मिळवला होता. एवढंच नाही तर तिने भय्यू महाराजांच्या घराच्या किल्ल्या देखील आपल्या हातात घेतल्या होत्या. ती सर्वांसमोर स्वत:ला भय्यू महाराजांची मुलगी असल्याचं भासवायची. पण वास्तव्यात ती भय्यू यांच्यासोबत प्रेयसी असल्यासारखं वागायची. ती आणि विनायक दर महिन्याला भय्यू महाराजांकडून दीड लाख रुपये वसूल करायचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *