नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम, उद्या पुन्हा होणार सुनावणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३१ जानेवारी । शिवसेना कार्यकर्ता संतोष परब (santosh parab attack case) जीवघेणा हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांच्यावर अटकेची टांगती तलवार अजूनही कायम आहे. आज सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून उद्या मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. तोपर्यंत नितेश राणेंना घरी जाण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यामुळे अखेर नितेश राणे यांना पुन्हा एकदा जामीन मिळवण्यासाठी कणकवली कोर्टामध्ये अर्ज दाखल करावा लागला. आज पुन्हा एकदा नितेश राणे यांच्या वकील संग्राम देसाई आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यात जोरदार युक्तीवाद झाला.

संग्राम देसाई यांनी पोलिसांनी तपासात काही मुद्दे उपस्थित केले. पोलीस बोलतायेत की नितेश राणे यांच्याकडे ७ मोबाईल नंबर आहेत पण फक्त ३ मोबाईल नंबर पोलिसांनी तपास अहवालात दिले. त्यातील एक नंबर ज्याचा नितेश राणे वापर केला असं पोलीस बोलत आहे. तो नितेश राणे यांनी ७ वर्षांपूर्वीच वापरायचे बंद केले. तो कोणाला तरी तिऱ्हाईत व्यक्तीला वोडाफोन कंपनीने दिला आहे त्याचा अहवाल कोर्टात सादर करतो. मोबाईल फोन नितेश राणे स्वतः डिसेंबर महिन्यात घेवून गेले होते, अशी माहिती देसाईंनी न्यायालयात दिली.

तसंच, ‘राणेंवर ३५३ च्या तीन केसेस आहेत. मालवण बांगडा फेक आंदोलन, इंजिनिअरच्या चेहऱ्याला काळे फासणे आणि डंपर आंदोलन या व्यतिरिक्त कोणतेही गुन्हे नाहीत, हे सर्व जनतेसाठी आंदोलन करताना झालेले गुन्हे आहेत, असा युक्तीवाद देसाई यांनी केला.

माझ्याकडे व्हॅन नाही. ज्या व्हॅन मध्ये कट रचला असं पोलिस तपासात बोललं जातय ती व्हॅन माझी नाही. माझ्याकडे कोणतेही शस्र नाही. माझे मोबाईल मी पोलिसांना दाखवले होते त्यामुळे माझ्या कोठडीची गरज नाही, असं राणेंच्या वतीने देसाई यांनी कोर्टात सांगितले.

व्हॅनिटी व्हॅन ही नितेश राणेंच्या वडिलांसाठी आणली होती. ती भाजपा पक्षाने भाड्याने आणली होती त्यामुळे ती ताब्यात घेण्याची गरज नाही. आम्ही जेव्हा पोलिस स्थानकात गेलो तेव्हा आमच्याकडे कुठलाही मोबाईलचा ताबा मागितला नाही. आम्हाला पासपोर्ट आणण्यासाठी सांगितले होते, त्याची फक्त पोलिसांनी फोटोकॉपी घेतली मग आता यांना ताब्यात घेण्याची काय आहे. नितेश राणेंचे गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्यांच्यावर फक्त तीन राजकीय गुन्हे आहे, ज्या पाच गुन्ह्यांचा उल्लेख केला जातो ते गुन्हे नाही तर आरोप आहेत घटना घडली तेव्हा ते अधिवेशनात होते, त्याची नोंद डायरीत आहे, असा दावाही देसाई यांनी केला.

नितेश रा़णे हे न्यायालयात आल्यानंतर ते बाहेर जावून आले. त्यांनी न्यायालयाची परवानगी घेतली होती का? मी न्यायालयाचा वेळ काढतो असा आरोप माझ्यावर प्रतिपक्षाच्या वकिलांनी केला मी त्यावर कायदेशीर आक्षेप घेतोय. असे राजकीय वक्तव्य बचाव पक्षाचे वकील कसे करु शकतात. नितेश राणे यांची पोलीस कोठडी गरजेची आहे कारण प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात प्रगती आहे, काही विशिष्ट मुद्दयांवर नितेश राणे यांची चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणीच घरत यांनी केली.

संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. दीड लाख रुपये सुपारीची रक्कम ठरला होती. त्यातील २० हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून हल्लेखोरांनी घेतला होता. हल्लेखोरांचा आणि आमदार नितेश राणे यांचा संपर्क झालाय असे पुरावे आहेत, असा दावाच घरत यांनी केला.

कोर्टाने दोन्हीकडचा युक्तीवाद ऐकून घेतला असून उद्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *