Madhubala | मधुबालाच्या बहिणीची 96 व्या वर्षी वणवण ; सुनेने घराबाहेर हाकललं,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ फेब्रुवारी । ‘बॉलिवूड मध्ये मधुबाला (Madhubala) अत्यंत प्रतिभाशाली अभिनेत्री होती. तिच्या सौंदर्य, व्यक्तिमत्त्व आणि चित्रपटांमधून तिने रेखाटलेल्या संवेदनशील स्त्री व्यक्तिरेखांसाठी ती ओळखली जात होती… किंबहुना आजही ओळखली जाते. कारण मधुबालाच्या सौंदर्य आणि अभिनयाचे चाहते तिच्या निधनाला पाच दशकं उलटून गेल्यानंतरही जगभरात आहेत. मधुबालाची आठवण निघण्याचं कारण म्हणजे तिच्या बहिणीसोबत झालेलं गैरवर्तन, तेही चक्क कुटुंबीयांकडून. मधुबालाची बहीण कनिझ बलसारा (Kaniz Balsara) यांना चक्क त्यांच्या सुनेनेच घराबाहेर हाकलल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे वयाच्या 96 व्या वर्षी त्यांच्यावर वणवण करण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंडमधील घरातून कनिझ यांना सूनबाईंनी बाहेरचा रस्ता दाखवल्याने त्यांना एकटीने विमान पकडून मुंबईतील लेकीकडे येण्याची वेळ आली.

सुनेने घराबाहेर हाकलले
23 फेब्रुवारी 1969 रोजी प्रदीर्घ आजारामुळे मधुबालाने अखेरचा श्वास घेतला, आणि तिची बहरणारी कारकीर्द संपुष्टात आली. तिच्या पश्चात कनिझ बलसारा आणि मधुर भूषण या दोन बहिणी आहेत. ETimes च्या वृत्तानुसार, 96 वर्षीय कनिझ बलसारा यांना त्यांच्या विधवा सुनेने न्यूझीलंडमधील घरातून बाहेर काढले आणि एकटीने मुंबईला जाण्यासाठी विमानात बसवले.

न्यूझीलंडहून मुंबईतील लेकीकडे
कनिझ यांची कन्या परवीज मुंबईतील वांद्रे भागात राहते. तिला चुलत भावामार्फत ही माहिती मिळाली. सून समीना आपल्या आईला अनेक वर्षांपासून वाईट वागणूक देत असल्याचं परवीजने सांगितलं. माझ्या बहिणीकडे असलेले पैसेही सुनेकडून काढून घेण्यात आले आहेत, असा आरोप कनिझ यांची धाकटी बहीण मधुर यांनी केला.

परवीजला विमानतळ प्राधिकरणाने फोन करुन बोलावले होते. निराधार असलेल्या आईकडे एक छदामही नव्हती. त्यामुळे ती भारतात प्रवेशासाठी अनिवार्य असलेली कोव्हिड-19 (RTPCR) चाचणीही करु शकली नाही.

मधुबालाची चकाकती कारकीर्द
14 फेब्रुवारी 1933 मध्ये मुमताज जहाँ बेगम देहलवीचा जन्म दिल्लीतील बॉम्बे टॉकीज फिल्म स्टुडिओजवळ असलेल्या गावात झाला. वयाच्या 9 व्या वर्षी ती पहिल्यांदा सिनेमात झळकली, तेव्हा तिचे नाव बेबी मुमताज होते. एक बाल कलाकार म्हणून तिने आपल्या कुटुंबाला आधार दिला. अल्प काळातच ती आघाडीची सुपरस्टार झाली. पडद्यावरील लालित्य आणि विलक्षण अभिनय कौशल्यासाठी ती ओळखली जाऊ लागली. पुढे तिला मधुबाला हे नाव मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *