महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । संतोष परब हल्लाप्रकरणी अटकेत असलेले नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी काल (सोमवारी) ही सुनावणी पार पडणार होती. परंतु, गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या निधनानंतर काल राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे कालची नितेश राणेंच्या जामीनावरील सुनावणी टळली.
भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्गातील ओरोसहून कोल्हापूरला नेण्यात आलंय. नितेश राणे यांचा पाठीचा आणि मानेचा त्रास वाढल्यानं कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. पोलीस रुग्णवाहिकेतून नितेश राणे कोल्हापूरकडे रवाना झाले होते. या पार्श्वभूमीवर सीपीआर रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आलं. त्यामुळे शनिवारी सुनावणी होणार नव्हती, मात्र अखेर सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. त्यानंतर आता जामीन अर्जावरील उर्वरीत सुनावणी ही सोमवारी पार पडणार होती. शिवाय सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आमदार नितेश राणे यांची सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे यांच्या समोर न करता, शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणाची ज्या न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू आहे, त्यांच्या समोरच घ्यावी, असा अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणी देखील आज होणं अपेक्षित आहे.
सर्वोच्च न्यायालयाने संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज आज फेटाळला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी गोट्या सावंत हे संशयित आरोपी आहेत. गोट्या सावंत हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते, तसेच आमदार नितेश राणेंचे विश्वासू आणि जवळचे सहकारी देखील आहेत. सर्वोच्च न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला असता तरी देखील 10 दिवसांच संरक्षण दिलं आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, मात्र त्यांना या कालावधीत स्वतः दिवाणी न्याया यालयात हजर व्हावं लागेल.