nitesh rane: ‘तो’पर्यंत आमदार नितेश राणे यांना कणकवली तालुक्यात प्रवेशबंदी; न्यायालयाची अट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ फेब्रुवारी । शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना कणकवली तालुक्यात प्रवेश बंदी केली आहे. तसेच ओरोस येथील पोलीस ठाण्यात आठवड्यातून एकदा हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. नितेश राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब यांच्यासाठी देखील हेच नियम लागू आहेत. (court imposes entry ban on mla nitesh rane in kankavli taluka till chargesheet is filed)

आमदार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. यावेळी या दोघांनाही अटी व शर्ती घालून दिले आहेत आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांना पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच या दोघांनाही ओरोस पोलीस ठाण्यात आठवड्यातून एकदा हजेरी लावावी लागणार आहे. शिवाय तपास कामात पोलिसांना गरज भासल्यास सहकार्य करायचे आहे. असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने या दोघांचीही प्रत्येकी तीस हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. अशी माहिती वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.

दरम्यान, नितेश राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान 18 डिसेंबर रोजी कणकवली शहरात भरदिवसा खुनी हल्ला झाला होता याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचे निकटवर्ती असलेल्या सचिन सातपुते याला अटक करण्यात आली होती. तर नितेश राणे यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले होते. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. मात्र त्यांचा जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर त्यांनी कणकवली न्यायालयात शरणागती पत्करली. न्यायालयाने त्यांची १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. अखेर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आणि तो आज मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, नितेश राणे यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर साक्षीदारांवर दबाव पडू नये याकरता त्यांना दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं अशा शब्दात यावेळी बोलताना माजी खासदार नीलेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून नितेश राणे यांना जामीन मिळाला आहे. मात्र मागच्या महिन्यात जे काही घडलं त्यावर बोलायची वेळ नाही असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *