महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ फेब्रुवारी । साई भक्तांसह प्रवाशांना आनंदाची बातमी पुणे -शिर्डी-नागपूर विमानसेवा 18 फेब्रुवारी पासून सुरू होणार असल्याची माहिती शिर्डी विमानतळाची संचालक सुशील कुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे. नागपूर व पुणे विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून प्रवाशांसह साई भक्तांची मागणी होती त्यानुसार विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे (Corona) मध्यंतरी 18 महिने शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) विमान सेवा बंद होती. आता विमान सेवा सुरळीत झाली आहे.
सध्या चार ठिकाणांसाठी विमान सेवा सुरू आहे. बंगलोरसाठी 2, दिल्लीसाठी 1, हैदराबाद 1, चेन्नई 1 अशा पाच विमान फेऱ्या आहेत. त्यात आता पुणे- शिर्डी – नागपूर अशी विमान सेवा सुरू होणार आहे. पुणे येथून येणारे विमान शिर्डी येथे येईल व तेच विमान नागपूरला जाणार आहे. त्याच दिवशी हे विमान नागपूरहून शिर्डीला येईल व तिथून पुणे येथे जाणार आहे. ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू ठेवण्याचा विमान कंपनीचा मानस आहे.