![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल 96 डॉलरवर पोहोचला आहे. लवकरच तो 100 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीं 2014 नंतर सर्वोच्च पातळीवर पोहचल्या आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची भीती आहेच, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना निष्प्रभ ठरत असल्यामुळे तेलाची मागणी ही वाढली आहे. त्यामुळे ही किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भारतात दिवाळीपासून इंधन दरवाढ झालेली नाही. उलट त्यावरील कर सवलतीमुळे अनेक राज्यात इंधनाच्या किंमती शंभरी अथवा त्यापेक्षा कमी झाल्या आहेत. देशात 4 नोव्हेंबर 2021 पासून तेलाच्या किंमतीत कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. या वर्षात 1 ते 14 जानेवारी दरम्यान कच्चा तेलाच्या किंमतीत 18 ते 20 टक्क्यांची वाढ झालेली आहे. पण त्याचा कुठलाही परिणाम देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर झालेला नाही. सहाजिकच एकदा निवडणुका आटोपल्या की सरकार किंमती वाढवेल अशी भीती सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाचा भाव 68.87 डॉलर प्रति बॅरल होता. जो आता 96 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे, म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाचे दर 34 टक्क्यांनी वाढले आहेत.
4 नोव्हेंबर 2021 रोजीपूर्वी निवडणुकांमुळे दरवाढीला चाप लावण्यात आला होता. 17 मार्च 2020 ते 6 जून 2020 दरम्यान पेट्रोलच्या किंमतीवर अंकुश ठेवण्यात आला होता. कारण पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळ येथील निवडणुका होत्या. त्याचबरोबर 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी तेलाच्या किंमती वाढवण्यात आल्या नव्हत्या. पण मतदानाच्या शेवटच्या टप्प्याच्या दुसऱ्याच दिवसापासून इंधन दरवाढ करण्यात आली होती.
