महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग आता मंदावला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारांहून कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 27 हजार 409 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 347 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. तर आदल्या दिवशी कोरोनाचे 34 हजार 113 नवे रुग्ण आढळले होते आणि 346 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. चांगली गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांत 82 हजार लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. यामुळे 55 हजार सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून देशात आतापर्यंत एकूण चार कोटी 26 लाख 92 हजार लोकांना लागण झाली आहे. त्यापैकी 5 लाख 9 हजार 358 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 17 लाख 60 हजार लोक बरे झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांपेक्षा कमी आहे. एकूण 4 लाख 23 हजार 127 जणांना अजूनही कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या एकूण रुग्णांची नोंद : चार कोटी 26 लाख 92 हजार 943
एकूण कोरोनामुक्त : 4 कोटी 17 लाख 60 हजार 458
एकूण सक्रिय रुग्ण : 4 लाख 23 हजार 127
एकूण मृत्यू : 5 लाख 9 हजार 358
एकूण लसीकरण : 173 कोटी 42 लाख 62 हजार डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहीम
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत देशभरात कोरोना लसीचे 173 कोटी डोस देण्यात आले आहेत. सोमवारी दिवसभरात 44.68 लाख डोस देण्यात आले. तर, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार (ICMR), आतापर्यंत 75.30 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी दिवसभरात सुमारे 12.29 लाख नमुने तपासण्यात आले.
देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे, तर बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 1.12 टक्के आहे. कोरोनाच्या सक्रीय रुग्णांच्या बाबतीत भारत सध्या जगात 24 व्या क्रमांकावर आहे. एकूण संक्रमित संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.