महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । काही काळापूर्वी मराठी रंगभूमीवर ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील अनेक लग्न करणारी लखोबा लोखंडेची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. ओडिशात अशाच एका लखोबा लोखंडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
बिधू प्रकाश स्वैन (54) असं या ठगाचं नाव आहे. तो ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्याचा रहिवासी आहे. स्वतःला आरोग्य मंत्रालयातील डॉक्टर म्हणवणाऱ्या बिधूने अनेक जिल्ह्यातल्या महिलांना फसवलं होतं. सुशिक्षित महिलाही त्याच्या जाळ्यात सापडल्या आहेत.
सध्या बिधू त्याच्या 14व्या बायकोसह ओडिशाची राजधानी भुवनेश्वर इथे राहत होता. त्याची पत्नी दिल्लीत शाळा शिक्षिका म्हणून काम करते. तिला आपल्या नवऱ्याची आधीच काही लग्न झाल्याची शंका आली. तिने खात्री केल्यानंतर तिला धक्काच बसला. तिच्यापूर्वी 13 जणींसोबत त्याने लग्न करून त्यांची फसवणूक केली होती.
तिने पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने खरोखर अशी फसवणूक केल्याचं उघड झालं. त्याने पहिलं लग्न 1982मध्ये केलं. त्यानंतर 2002मध्ये दुसरं लग्न केलं. या दोन्ही लग्नसंबंधापासून त्याला 5 मुलं आहेत. त्यानंतर त्याने 2002 ते 2020 दरम्यान मेट्रिमोनियल साईटवरून त्याने अनेक महिलांशी मैत्री केली आणि त्यांच्याशी लग्न करून मोकळा झाला.
या महिला ओडिशा, पंजाब, दिल्ली, झारखंड या राज्यांमधील आहेत. जवळपास सात राज्यांमध्ये त्याने ही फसवणूक केली. त्याच्या जाळ्यात फसलेल्या महिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलाचाही समावेश आहे. बिधू त्यांच्याशी मैत्री करून मग लग्न करत असे, मग त्यांच्याकडून पैसे उकळत असे. पोलिसांनी त्याला अटक केली असून आपण अशी कोणतीही फसवणूक केली नसल्याचा दावा बिधूने केला आहे.