महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ फेब्रुवारी । या वर्षीच्या मॉन्सून अंदाजाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक आनंदाची बातमी आहे. या वर्षी देशात मॉन्सून सामान्य राहील, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खासगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने (Skymet) एजन्सीने 2022 साठी प्राथमिक मॉन्सून अंदाज जारी केले आहे. त्यानुसार यंदा मॉन्सून सामान्य राहणार असून 2022 मध्ये मॉन्सून सरासरीच्या 97 ते 104 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.( Skymet Released Pre Forecast For 2022)
स्कायमेट्सच्या पूर्वानुमानानुसार सुरुवातीच्या काळात मॉन्सूनची स्थिती चांगली असेल. तसेच या काळात भरपूर पाऊस (Rain) पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर हा हंगामी काळ शेतकऱ्यांसाठी अनुकूल राहील असे सांगण्यात आले आहे. एजन्सीचे उपाध्यक्ष आणि मुख्य हवामानशास्त्रज्ञ डॉ. पलावत यांनी याबाबत माहिती दिली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पाहायला मिळेल. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या मध्यात कमी पाऊस पडू शकतो, परंतु मॉन्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे, असे पलावत म्हणाले. 2021 मध्येही मॉन्सून सामान्य राहील असा अंदाज सांगण्यात आला होता. दरम्यान, एप्रिल महिन्यात स्कायमेटकडून मॉन्सूनबाबतचा सविस्तर अंदाज सांगितला जाणार आहे.