महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । दिशा सालियन (Disha Salian) हिच्या मृत्यू प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिशा सालियन प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. त्यासोबतच भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनीही दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर ट्विट केलं आहे. याच दरम्यान आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी दिशा सालियनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होतोय, आम्हा जगू द्या अशी हात जोडून विनंतीच त्यांनी केली आहे.
राजकारणामुळे जगणं मुश्किल झालंय
दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी दिशाच्या आईने म्हटलं, राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. जगू दिलं जात नाहीये. आम्हाला आता त्रास देऊ नका, आम्हाला जगू द्या. राजकीय नेते आमच्या मुलीला बदनाम करत आहेत. ती सोडून गेलीय…. यांना आम्हाला बदनाम करण्याचा काय अधिकार आहे? असा सवालही उपस्थित केला.
आम्ही या संदर्भात महिला आयोगांना लेखी तक्रार केली आहे. आम्हाला आता पुढे त्रास देऊ नका असं आम्ही पत्रात म्हटलं आहे. आम्ही विनंती करतो की, आम्हाला त्रास देऊ नका. आमच्या एकुलत्या एक मुलीला आम्ही गमावलं आहे. तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या असंही दिशाच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे.
… तर आम्ही जगणार नाही
जे दावे केले जात आहेत तसं काहीही झालेलं नाहीये माझ्या मुलीला विनाकारण बदनाम केलं जात आहे. सर्व सत्य पोलिसांना माहिती आहे. बदनामी होत राहिली तर आम्ही जगणार नाही. आम्ही जीवाचं बरंवाईट केलं तर त्यासाठी नेते जबाबदार असतील. मी आता हात जोडून विनंती करते की, कुणालाही बदनाम करु नका असंही दिशाच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
ज्यावेळी घटना घडली तेव्हा दिशा आमच्याच घरी होती. तिच्यासोबत सर्व मित्रच होते. आता आम्ही किंवा पोलिसांनी बोलावलं तर दिशाचे मित्र सर्व पुन्हा इथे येतील. कुणीही पळून गेलेलं नाहीये असंही दिशाच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.