पुणेकरांसाठी नळस्टॉप उड्डाणपूल कधी खुला होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । कर्वे रस्त्यावरून मेट्रो धावायला सुरुवात झाली असली, तरी वाहनचालकांना दिलासा देणारा अभिनव चौकातील (नळस्टॉप) उड्डाणपूल खुला करण्यास महापालिका आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) मुहूर्त मिळालेला नाही. महामेट्रोकडून हा पूल महापालिकेला हस्तांतरित करण्याची मुदत संपून दोन आठवडे उलटले, तरी त्याचा ताबा पालिकेला मिळालेला नाही. परिणामी, हा पूल खुला होणार तरी कधी असा सवाल कर्वे रस्त्याने येणारे हजारो वाहनचालक करीत आहेत.

गेल्या महिन्यात महापौर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या पाहणीत २३ फेब्रुवारीपर्यंत उड्डाणपुलाचा ताबा महापालिकेकडे दिला जाईल, असे आश्वासन महामेट्रोने दिले होते. ही मुदत उलटून १५ दिवस झाले, तरीही अद्याप पूल खुला झालेला नाही. गरवारे कॉलेजवरून नळस्टॉपपर्यंत आणि पुढे पौड रस्त्याने वनाझपर्यंत मेट्रो सेवा सुरू झाली असली, तरी अनेक वाहनचालकांना अद्याप दैनंदिन स्वरूपात कर्वे रस्त्याचा वापर करावाच लागतो. उड्डाणपुलाच्या कामामुळे या भागात वाहनचालकांना अत्यंत अरुंद रस्त्यावरून पुढे जावे लागत आहे. मेट्रो सेवेसोबतच हा उड्डाणपूल खुला होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, अजूनही किरकोळ कामे अपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता हा पूल नेमका कधी खुला होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

मेट्रो प्रकल्प व या दुमजली उड्डाणपुलाच्या कामासाठी सुमारे तीन वर्षांपासून ‘एसएनडीटी’कडून डेक्कनकडे जाणारी वाहतूक कॅनॉल रस्त्यामार्गे आठवले चौकातून अभिनव चौक (नळस्टॉप) अशी वळविण्यात आली आहे. हा रस्ता चिंचोळा असल्याने जड वाहने आल्यानंतर; तसेच इतरही अनेक वेळा या रस्त्यावर सातत्याने वाहतूककोंडी होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंधात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांसह सरकारी-खासगी कार्यालयेही पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. परिणामी, रस्त्यावरील रहदारी वाढली आहे. सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत या परिसरात मोठी गर्दी होते. त्यामुळे हा पूल खुला झाल्यास नागरिकांची कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नेत्यासाठी रखडले उद्‌‌घाटन?

येत्या दोन दिवसांत या उड्डाणपुलाची उर्वरित किरकोळ कामे पूर्ण होतील, असे ‘महामेट्रो’तर्फे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, हा उड्डाणपूल बांधून तयार आहे. मात्र, आता महापालिकेने या पुलाचे सुशोभीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे आणि विशिष्ट नेत्याच्याच हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन व्हावे, अशा आग्रहामुळेच या पुलाचे उद्घाटन रखडल्याची चर्चा आहे.

 

उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये

– पुण्यातील पहिला दुमजली उड्डाणपूल

– मेट्रो व महापालिकेचा संयुक्त प्रकल्प

– एकूण लांबी ५५० मीटर

– पुलावरून चारपदरी वाहतूक

– पहिल्या मजल्यावरून वाहने व दुसऱ्या मजल्यावरून मेट्रो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *