महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नचे पार्थिव अखेर सात दिवसांनंतर मायदेशी ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात आले आहे. 30 मार्च रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून वॉर्नच्या अंत्यदर्शनासाठी प्रवेशिका अनिवार्य असणार आहे. हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार गुरुवारी (दि.10) सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी शेन वॉर्नचे पार्थिव मायदेशाकडे रवाना झाले.
4 मार्च रोजी थायलंडमधील कोह समूई बेटावरील रिसॉर्टवर 52 वर्षीय शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचे पार्थिव रविवारी सुरत थानी येथे नेण्यात आले होते. तेथून ते बँकॉकला हलविण्यात आले. शेवटी गुरुवारी वॉर्नचे पार्थिव मायदेशी पाठविण्यात आले. वॉर्नच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्याचा मृत्यू हा नैसर्गिक होता आणि त्यात कुठलाही घातपात नव्हता, असे स्पष्ट झाले आहे.
क्रिकेटविश्वातील महान फिरकी गोलंदाज असलेल्या शेन वॉर्नच्या पार्थिवावर मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरही उपस्थित असतील. मेलबर्नला होणाऱया अंत्यसंस्कारापूर्वी वॉर्नचे कुटुंबीय खासगीत त्याला आदरांजली वाहणार आहेत. वॉर्नला निरोप देण्यासाठी ‘एमसीजी’वर लाखोंचा जनसागर उसळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे व्हिक्टोरिया शासन सामान्य नागरिकांसाठी तिकिटे उपलब्ध करणार आहे. नेमकी किती तिकिटे उपलब्ध असतील, तसेच ही तिकिटे मोफत देण्यात येतील अथवा त्यांचे मूल्य आकारले जाईल याविषयी लवकरच व्हिक्टोरिया शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात येईल. याचबरोबर ऑस्ट्रेलियातील वृत्तवाहिन्यांवर वॉर्नच्या अंत्यविधीचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने जगभरातील त्याच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या क्रिकेटपटूचा अखेरचा विधी बघता येणार आहे.