महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । ‘यूपी तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ अशा घोषणा देणाऱ्या भाजप नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘महाराष्ट्र तैयार है’ अशा शब्दात उत्तर दिले आहे. तर, संसदेच्या आगामी अधिवेशन काळात दिल्लीत विरोधी नेत्यांशी चर्चा केली जाईल. आगामी काळात एकत्र येण्याबाबत गांभीर्याने विचार करता येईल, असेही पवार म्हणाले.
पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर भाष्य करताना पवार म्हणाले की, पंजाबचा निकाल काँग्रेस पक्षाला एकप्रकारे झटका देणारा आहे. ‘आप’ या अलीकडे बनलेल्या राष्ट्रीय पक्षाने दिल्लीतील गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्या प्रकारो यश संपादन केले आणि ज्यापद्धतीचे प्रशासन दिले त्याला दिल्लीकरांनीही पसंती दिली. आपने दिल्लीत केलेल्या कामाचा परिणाम हा पंजाबमध्येही झाला. या आधी पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वातील सरकार होते. मात्र, केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षासोबत लढण्याच्या त्यांच्या निर्णयाचा लोकांवर नकारात्मक प्रभाव पडला. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे आणि पंजाबच्या शेतकऱ्यांचा केंद्र सरकारविरूद्ध जो राग होता तो मतदानात दिसल्यामुळे त्यांनी आप पक्षाला संधी दिली.
उत्तर प्रदेशात बहुमत जरी मिळाले नसले तरी समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात आपला जम बसवला आहे, हे दिसून आले. तृणमूल काँग्रेसने ऐनवेळेस गोव्याच्या निवडणुकीत सहभाग घेतला. अन्य पक्षाचे लोक घेऊन निवडणूक लढवणे त्यांनी टाळले असते तर बरे झाले असते, असेही पवार म्हणाले.