महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ११ मार्च । महाराष्ट्रात सत्तांतर हे अटळ आहे. २०२४ साली महाराष्ट्रात पूर्ण बहुतमताने भाजपची सत्ता आलेली दिसेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केले. चार राज्यांतील निवडणुकांच्या निकालांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. सामान्य माणसाच्या मनावर अजूनही नरेंद्र मोदी यांची जादू कायम आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्यात मोदींच्या प्रभावामुळेच अँटी-इन्कम्बन्सीचे रुपांतर प्रो-इन्कम्बन्सीमध्ये झाले. मोदींच्या नेतृत्त्वामुळेच भाजपला मोठा विजय मिळवला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
चार राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे महाराष्ट्रात सत्तापालट होणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आता एकहाती सत्ता आणण्याच्या तयारीला लागल्याचे सांगितले होते. चार राज्यांमधील विजयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. महाराष्ट्रात याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. आता आम्ही २०२४ मध्ये भाजपला पूर्ण बहुमताने निवडून आणण्यासाठी तयारी सुरु केली आहे, असे फडणवीस यांनी गोव्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केल्यामुळे भाजप आता शिवसेनेलाही बाजूला ठेवून एकहाती सत्तेसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.