महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । चीननंतर आता दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा भडका उडाला आहे. दक्षिण कोरियामध्ये बुधवारी चार लाखांहूनही अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या जानेवारीपासूनचा हा सर्वाधिक आकडा आहे. यापैकी परदेशवारी किंवा बाहेरगावी जाऊन आल्याने प्रादुर्भाव झालेल्या बाधितांची संख्या अत्यल्प आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियामध्ये ४ लाख ७४१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून आढळलेल्या रुग्णसंख्येपैकी ही संख्या सर्वाधिक आहे. आता दक्षिण कोरियामधील कोरोनाबाधितांची संख्या ७ कोटी ६ लाख २९ हजार २७५ एवढी झाली आहे. मंगळवारी म्हणजे काल एकाच दिवसात दक्षिण कोरियात २९३ मृत्यूंची नोंद झाल्याची आकडेवारी इंडिया टुडेने दिली आहे.
सध्या चीनमध्येही कोरोनाचा कहर सुरू आहे. कोट्यावधी नागरिकांना यामुळे टाळेबंदीत राहावे लागत आहे. चीनमध्ये बुधवारी ३,२९० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, यापैकी ११ जण अतिगंभीर आहेत. चीनमधील वुहान जिथे २०१९ च्या शेवटी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती, तिथे मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे एकही मृत्यू झाल्याचे आढळत नाही.