महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मार्च । २०० हून अधिक जणांच्या एका संतप्त जमावाने गुरुवारी येथील इस्कॉन मंदिर व तिथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर हल्ला केल्यामुळे बांग्लादेशातील हिंदू समुदायात दहशत निर्माण झाली आहे. या घटनेत ३ भाविक जखमी झालेत.
‘राजधानी ढाका येथील श्री राधाकांत मंदिरात गुरुवारी सायंकाळी भाविक गौर पौर्णिमेच्या उत्सवाची तयारी करत होते. त्यावेळी २०० हून अधिक जणांच्या एका जमावाने अचानक मंदिरावर हल्ला चढवून तोडफोड करण्यास सुरुवात केली’, अशी माहिती इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारामन दास यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थे्ला बोलताना दिली. ‘या घटनेत आमचे ३ भाविक जखमी झालेत. सुदैवाने त्यांनी पोलिसांना पाचारण केल्यामुळे हल्लेखोरांना मंदिर परिसरातून हुसकावून लावण्यात यश आले’, असे ते म्हणाले. ‘हा हल्ला अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. बांग्लादेश सरकारने या प्रकरणी कठोर कारवाई करुन हिंदू अल्पसंख्यकांना सुरक्षा पुरविली पाहिजे’, असेही दास म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी बांग्लादेशातील अल्पसंख्यक समुदायावर लागोपाठ हल्ले झाले होते. त्याच्या कटू आठवणी अद्याप ताज्या असताना हल्ल्याची ही घटना घडल्यामुळे येथील हिंदू समुदायात दहशत पसरली आहे.
गत १६ ऑक्टोबर रोजी जमावाने बांग्लादेशाच्या नोओखाली शहरातील इस्कॉन मंदिरावर हल्ला केला होता. त्यात एका भाविकाचा बळी गेला होता.
तत्पूर्वी, १३ ऑक्टोबर रोजी कुमिल्ला येथील एका कार्यक्रमात पवित्र कुराणाचा कथित अवमान झाल्यानंतर बांग्लादेशात मोठा जातीय तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर देशातील अनेक जिल्ह्यांत हिंसाचार उफाळला होता.