महाराष्ट्र २४; ऑनलाईन ; मुंबई : देशातील लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात येणार नाही. 14 एप्रिल रोजी मध्यरात्रीच ती संपेल, असा संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिला. लॉकडाऊन संपल्यानंतर 15 एप्रिलला नागरिकांचा लोंढा एकाचवेळी रस्त्यावर येणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू केले जावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांसंबंधी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन तसेच आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोरोना रोखण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न फलदायी ठरतील असे दिसू लागले आहे. परंतु, अजूनही सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) बाळगणे आवश्यक आहे. आपली गेल्या 21 दिवसांची तपस्या वाया जाणार नाही, याची काळजी सर्वच राज्यांनी घेतलीच पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. लॉकडाऊननंतर विविध भागांमध्ये नागरिकांची झुंबड टाळण्याचे आव्हान प्रत्येक राज्यांना पेलावे लागणार आहे, असे सांगत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवण्याचा पर्यायही मोदींनी राज्यांना सुचवला आहे.
राज्यांकडून थकित रकमेची मागणी
बैठकीदरम्यान राज्यांनी केंद्रांकडे वैद्यकीय किट, थकित रकमेसह आर्थिक मदतीची मागणी केली. लॉकडाऊन निर्णयाची अंमलबजावणी कधीपर्यंत केली जाईल, असा प्रश्नही विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून उपस्थित करण्यात आला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी पंतप्रधानांकडे अडीच हजार कोटींची मागणी केली. यासोबतच राज्याचे 50 हजार कोटींची थकित केंद्राने लवकरात लवकर देण्याचीही मागणी करण्यात आली.