महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ मार्च । सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Session) सुरू आहे. आज विधानसभेत महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण राजभाषा विधेयक (Marathi Language Bill) सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य होणार आहे. इतकंच नाहीतर राज्यात असलेल्या केंद्राच्या कार्यालयात देखील मराठीचा वापर अनिवार्य असणार आहे.
भाजप आमदारांनी देखील मराठी राजभाषा विधेयकाला पाठिंबा दिला आहे. आता महापालिका आणि सरकारी कार्यालयाच्या कामकाजाची भाषा मराठी असेल, असे आशिष शेलार म्हणाले. तसेच विधानपरिषदेत देखील प्रविण दरेकर यांनी या विधेयकाचं स्वागत केलं. पण, कायदा फक्त दिसण्यापुरता असू नये. त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. मुंबई महापालिका आणि इतर कार्यलयांनी मराठीच्या संदर्भात कृती करावी, असं प्रविण दरेकर म्हणाले. त्यानंतर या मराठी भाषा विधेयकाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असं मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई म्हणाले.
आता मराठी भाषा विधेयक मंजूर झाले आहे. केंद्र सरकारने मराठीला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.