महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ मार्च । आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. यंदाचं हंगाम कोलकाताच्या संघासाठी वेगळ ठरण्याची शक्यता आहे. कारण, कोलकाताचा संघ यंदा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. नेहमीप्रमाणे या आयपीएलमध्ये देखील नवे विक्रम बनण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर यांच्याकडं इतिहास घडवण्याची संधी आहे.
1) विराट कोहली
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटनं 207 सामन्यात 37.4 च्या सरासरीनं 6 हजार 282 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या चौदाव्या हंगामानंतर विराट कोहलीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. यामुळं यंदाच्या हंगामात विराट कोहली कशी कामगिरी करतो? याकडं सर्वांच लक्ष लागलंय.
2) शिखर धवन
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिखरनं आयपीएलमध्ये चार संघाचे प्रितिनिधित्व केलं आहे. यंदाच्या हंगामात तो पंजाब किंग्जकडून खेळणार आहे. त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 192 सामन्यात 34. 8 च्या सरासरीनं 5 हजार 784 धावा केल्या आहेत.
3) रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सच्या संघाला 5 वेळा आयपीएलचे जेतपद जिंकून देणारा रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मानं या स्पर्धेत 213 सामन्यात 5 हजार 611 धावा ठोकल्या आहेत.
4) सुरेश रैना
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाच्या विक्रम अनेक काळ चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैनाच्या नावावर होता. मात्र, या यादीत तो चौथ्या क्रमांकावर गेलाय. विराट कोहलीनं आयपीएलच्या बाराव्या हंगामात धावांचा पाऊस पाडत सुरेश रैनाला मागं टाकलं. सुरेश रैनानं आयपीएलमध्ये एकूण 205 सामने खेळले आहेत. ज्यात 32.5 च्या सरासरीनं 5 हजार 528 धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामातील मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैनावर कोणत्याही खेळाडूनी बोली लावली नाही. यामुळं यंदाच्या हंगामातही सुरेश रैना खेळताना दिसणार नाही.
5) डेव्हिड वार्नर
आस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वार्नरनं नेहमीच आपल्या खेळीनं चाहत्यांचं मनोरंजन केलंय. डेव्हिड वार्नरनं 2009 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलंय. त्यानं 150 सामन्यात 41.6 च्या सरासरीनं 5 हजार 449 धावा केल्या आहेत. एवढंच नव्हंतर, तीन वेळा ऑरेंज कॅपचा खिताब आपल्या नावावर नोंदवलाय.