महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ मार्च । बंगालच्या उपसागरात (bay of bengal) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची (Low pressure area) तीव्रता आता कमी होत आहे. त्यामुळे बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारपट्टीला बसणारा संभाव्य धोका काहीसा कमी झाला आहे. असं असलं तरी दोन्ही देशाच्या किनारी भागात वेगवान वारे वाहत असून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होताच मराठवाड्यासह विदर्भातील कमाल तापमानात वाढ (Temperature rise in maharashtra) नोंदली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात उष्णता वाढत असताना, घाट परिसर, दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण महाराष्ट्रात मात्र ढगाळ हवामानाची (Cloudy weather) नोंद झाली आहे. पुढील आणखी चार दिवस कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत.
हवामान खात्याने लेटेस्ट जारी केलेल्या सॅटेलाईट इमेजनुसार, आज कोकणासह महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, उत्तर केरळ, पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या गुजरातमध्ये ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तर आज महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या दहा जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही तासांत संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उर्ववरित महाराष्ट्रात मात्र कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे.
24 March, Latest satellite obs at 10 am indicates, cloudy skies over parts of western Maharashtra, including Konkan and parts of Coastal Karnataka and N Kerala, Parts of w est MP and adjoining areas of Gujarat pic.twitter.com/Hr5IzCBPmQ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 24, 2022
उद्यापासून राज्यात ढगाळ हवामानाचा जोर काहीसा कमी होणार असून कमाल तापमानात किंचितशी वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यात हलक्या सरी बरसणार आहेत.
दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामान असलं तरी मराठवाडा आणि विदर्भात मात्र उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता आहे. आज अकोला याठिकाणी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून येथील पारा 41.6 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. त्यापाठोपाठ ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर याठिकाणी प्रत्येकी 41.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उर्वरित महाराष्ट्रातलं कमाल तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं आहे. येत्या काळात मराठवाड्यात कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.