महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याचा शो काही दिवसांपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या शोबाबत धक्कादायक खुलासा करत कपिल शर्मावर टीका देखील केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा या शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. काही रिपोर्ट्नुसार हा शो लवकरच बंद होणार आहे आणि आता यामागचं कारण समोर आलं आहे. कपिल शर्मानं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावरुन वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत.
कपिल शर्मानं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या अमेरिका आणि कॅनडा ट्रीपबद्दल लिहिलं आहे. या ट्रीपमध्ये आपण खूप एन्जॉय करणार असल्याचंही त्यानं त्याच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कपिल शर्माची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कपिल शर्मा कामातून ब्रेक घेणार असल्यानं त्याचा शो बंद होणार असल्याचं अंदाज लावला जात आहे.