महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मार्च । शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) (RTE) खासगी शाळांमधील (Private School) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी (Admission) राबविण्यात येणाऱ्या प्रवेशाची सोडत (लॉटरी) (Draw) मार्चअखेरपर्यंत जाहीर होणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत येत्या दोन दिवसांत अधिकृतपणे सोडत जाहीर करण्याची तारीख अंतिम केली जाणार आहे.
आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्रवेश प्रक्रियेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता राज्यातील जवळपास ९ हजार ८८ शाळांमधील तब्बल एक लाख दोन हजार २२ जागांकरिता सुमारे दोन लाख ८२ हजार ७७६ अर्ज आले आहेत. प्रवेश प्रक्रियेमार्फत मुलांच्या प्रवेशासाठी यंदा मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत.
या प्रवेश प्रक्रियेला १६ फेब्रुवारीपासून सुरवात झाली. परंतु आरटीई पोर्टलवर पुणे जिल्ह्यातील शाळांची नोंदणी पूर्ण न झाल्याने जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीच्या चौथ्या आठवड्यात सुरू झाली. प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या सोडतीकडे लाखो पालकांचे लक्ष लागले आहे.