मशिदींवरील भोंग्यांच्या प्रकरणामध्ये आता अबू आझमींची उडी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ एप्रिल । गुढीपाडव्यानिमित्त दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित मनसे मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजानसाठी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांवर आक्षेप घेतला. प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका मांडताना राज ठाकरेंनी मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्यामुळे त्यावर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी केली आहे. राज ठाकरेंच्या या मागणीला भाजपच्या नेत्यांनीही सहमती दर्शविली आहे. असे असतानाच आता या मागणीवरुन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू सणांचा संदर्भ देत त्यावेळी वाजवण्यात येणाऱ्या डीजेमुळेही ध्वनिप्रदूषण होते, असा मुद्दा आझमी यांनी उपस्थित केला आहे.

ध्वनिप्रदूषणाची तक्रार मशिदींवरील भोंग्यांमुळे असेल, तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?, असा सवाल अबू आझमी यांनी उपस्थित केला. आझमी पुढे बोलताना, पण आम्ही कधी याबाबत तक्रार केली नसून केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर किंवा भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही म्हणाले. त्याचप्रमाणे जनता राज ठाकरेंच्या या भूमिकेला थारा देणार नाही, असा विश्वासही आझमी यांनी व्यक्त केला.

मशिदीवरील भोंगे काढले नाही, तर मशीदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. आझमी यांनी यावरही प्रतिक्रिया देताना, मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी, सरबत देऊ, धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको असल्याचे स्पष्ट केले आहे. वेगवेगळे उत्सव व विवाह समारंभातील डीजेंमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावरून राज ठाकरे यांनी कधी आवाज उठविला नाही, असा आक्षेपही आझमी यांनी घेतला आहे.

शिवाजी पार्क शांतता क्षेत्रात येते. मग त्यांच्या सभेच्या वेळी आवाजाची पातळी किती होती व किती ध्वनिप्रदूषण याची पोलिसांनी तपासणी करून कारवाई करावी. सभा व अन्य कार्यक्रमांमध्ये लावले जाणारे ध्वनिवर्धक, फटाके यामुळेही ध्वनिप्रदूषण होते. पण आमची कधीच, काहीही तक्रार नसल्याचेही आझमी म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *