महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ एप्रिल । आज ईडीनं (ED) शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान संजय राऊत यांची अलिबाग आणि दादरमधील (Alibag and Dadar) संपत्तीवर टाच आणली आहे. ईडीनं अलिबागमधील 8 जमिनीचे प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅट जप्त केले आहेत. नेमकी कोणती संपत्ती ईडीनं ताब्यात घेतली आहे त्यावर एक नजर टाकूया.
संजय राऊत यांच्यासह कुटुंबियांच्या नावावर असलेले अलिबागमधील आठ भूखंड ईडीनं जप्त केले आहेत. तसंच दादरमध्ये पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर असलेला राहत्या फ्लॅटवर ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे. दादरमधील एका इमारतीत 32 व्या मजल्यावर हा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे.
गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचं काम देण्यात आलं होतं. मात्र प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या साथीनं या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर भागातील या झोपडपट्टीचं काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. हा व्यवहार तब्बल 1000 कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे.