Raj Thackeray: राज ठाकरे डॅमेज कंट्रोल मोडमध्ये; पुण्यातील तिघांना मुंबईत बोलावलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता. त्यानंतर पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी त्यावर ठाकरे यांच्या भाषणामुळे आपण बेचैन असल्याचे मत व्यक्त केले. प्रभागातील काही मुस्लीम मतदारांनी ते भयग्रस्त झाले असल्याचेही आपणाला सांगितले. एका शाखाप्रमुखाने राजीनामा दिला, असेही मोरे यांनी जाहीर केले.

राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे पुण्यातील एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने देखील पक्षाचा राजीनामा दिला होता. तसेच राज्यातील अनेक मुस्लिम पदाधिकारी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुण्यातील महत्वाच्या नेत्यांना आज शिवतिर्थावर बोलावले आहे. मात्र मनसेचे नगरसेवक आणि पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना निमंत्रण न दिल्याची माहिती समोर येत आहे.

‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार, राज ठाकरेंनी पुण्यातील मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, अनिल शिदोरे आणि मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना मुंबईत बोलावलं आहे. मात्र पुण्यातील मनसेतील मोठं नाव असलेल्या वसंत मोरे यांना निमंत्रण न दिल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या भाषणामुळे अन्य राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडणे, त्यांनी टीका करणे समजण्यासारखे आहे, मात्र पक्षाच्याच नगरसेवकांनी त्या भाषणामुळे मी बेचैन आहे असे म्हणणे योग्य नाही, असे मत मनसेचे नेते राजेंद्र वागसकर यांनी सांगितले. ९ मार्चला ठाण्यात आयोजित सभेत खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरेच त्यावर बोलणार आहेत, त्यातून मोरे यांचे समाधान होईल, असे ते म्हणाले.

वागसकर यांनी त्यावर बोलताना कोणत्याही पक्षात संघटना, लोकप्रतिनिधी असे वेगळे काहीही नसते. पक्षाध्यक्षांचा आदेश महत्त्वाचा असतो व कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी त्याचे पालन करायचे असते, असे स्पष्ट केले. मोरे यांच्या भावनांची दखल राज ठाकरे घेतील. याच विषयावर राज्यातील अन्य राजकीय पक्षांनीही बरेच भाष्य केले आहे. त्यामुळेच ९ मार्चला ठाण्यात पक्षाध्यक्ष ठाकरे यांची सभा होणार असून ते स्वत:च या सर्व गोष्टींना उत्तर देतील, असे वागसकर म्हणाले.

मी शहराध्यक्ष असलो तरी एक लोकप्रतिनिधी आहे, माझ्या प्रभागातील मुस्लिम मतदार नाराज होत असतील, भयग्रस्त होत असतील तर मला त्याची काळजी करायलाच हवी. राज ठाकरेंवर नाराज नाही, मात्र बेचैन आहे, प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन यावर बोलेन असेही मोरे म्हणाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *