![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ एप्रिल । सार्वजनिक आणि धार्मिक स्थळाच्या ठिकाणी लाऊडस्पीकर अर्थातच भोंगे वापराबाबत मुंबई पोलिस आयुक्तांसह राज्याचे पोलिस महासंचालक मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत आहेत. येत्या दोन दिवसांत यासंदर्भातील धोरण ठरविण्यात येईल. त्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यभरासाठी अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी दिली. दरम्यान, भोंग्यांबाबत नियमावली ठरविण्यासाठी आज, मंगळवारी पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापुढे सर्वधर्मीय सणांना परवानगी बंधनकारक करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे समजते.
मनसे नेते राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली आहे. भोंगे उतरवले नाही, तर त्या ठिकाणी हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठक झाली. भाजप आणि मनसेच्या नेत्यांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय का, याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आल्याचे समजते.
