![]()
महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२२ एप्रिल । डोंबिवलीमध्ये आज पहाटे चार वाजल्यापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळेच उकाड्याने हैराण झालेल्या रहिवाश्यांनी महावितरणाच्या कार्यालयासमोर भल्या पहाटेपासूनच गर्दी केल्याच चित्र पहायला मिळालं. प्राथमिक माहितीनुसार पाल वीज केंद्रामध्ये बिघाड झाल्याने विजपुरवठा खंडित झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात महावितरणाकडून अद्याप कोणतीही माहिती रहिवाशांना देण्यात आलेली नाही.
पहाटे चारच्या सुमारास डोंबिवलीमधील काही भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला. ऐन साखर झोपेच्या वेळी वीज गेल्याने आणि प्रचंड उकाड्यामुळे ठीकठिकाणी लोक रस्त्यावर उभी असल्याचं चित्र दिसलं. नंतर बराच वेळ वाट पाहूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने बाजीप्रभू चौकामधील महावितरणाच्या कार्यालयासमोर रहिवाशांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. रहिवाशी संतप्त झाल्याने बाजीप्रभू चौकामधील महावितरणाच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. अनेकजण पोलिसांनाच आपली गाऱ्हाणी सांगतानाचं चित्र पहायला मिळालं.