महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल । राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष विस्तार आणि लोकप्रतिनिधी संख्याबळ वाढावे यासाठी राज्यव्यापी जनसंवाद यात्रा सुरू आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी करवीरनगरीत सभा पार पडली. यावेळी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव भाषणात का घेता? असा सवाल मला विचारणाऱ्यांना महाराष्ट्रच समजलेला नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
“माझ्यावर फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाही? अशी टीका करण्यात आली. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे तुमच्या माझ्या अंतःकरणात लिहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा आगळावेगळा राजा होऊन गेला. अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून राज्य प्रस्तापित करण्याचे ऐतिहासिक काम कोणी केले असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. या देशात अनेकांची राज्ये येऊन गेली, पण ३००-४०० वर्षांनंतर कोणाची आठवण येत असेल तर एकच उत्तर येते छत्रपती शिवाजी महाराज. सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये स्थान प्रस्तापित केलेले हे नेते होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य भोसल्यांचे नव्हते, ते रयतेचे होते, हिंदवी स्वराज्याचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव तुमच्या आमच्या अंतःकरणात आहे त्यासाठी कुणी सांगायची आवश्यकता नाही,” असे शरद पवार म्हणाले.
“महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाबाबत पहिले काम खऱ्या अर्थाने कोणी केले असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. शाहू महाराज आगळेवेगळे राजे होते. खोट्या गोष्टीचा पुरस्कार त्यांनी कधी केला नाही. तसेच देशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान देखील खूप मोठं आहे. त्यामुळे शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अभिमान हा प्रत्येक माणसाला असला पाहिजे. जे शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव का घेता असे विचारतात त्यांना महाराष्ट्र समजलाच नाही,” असा टोला पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.