राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी करण्यास कोर्टाचा नकार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल । हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणे भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणा दांम्पत्यावर १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. दरम्यान दोघांच्या जामिनावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. आता रवी राणा आणि नवनीत राणा यांची कारागृहात रवानगी होणार आहे.

दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी शनिवारी अटक केली होता. त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. धार्मिक कारणावरून दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे व एकोप्याला बाधक कृती केल्याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दांपत्याच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर राणा दांम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

“आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर २७ तारखेला आमचे लेखी म्हणणे मांडण्यासाठी सांगितले आहे. यावर २९ तारखेला सुनावणी होणार आहे. तसेच यामध्ये १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

“मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केलं. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला,” असेही सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.

“खार पोलिसांनी नवनीत आणि रवी राणा यांच्या तक्रारीवरून दुसर्‍या बाजूने एफआयआर नोंदवल्यानंतर, पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध ३५३ आयपीसीचा आरोप म्हणून दुसरी एफआयआर नोंदवली असल्याचे दिसते,” असे नवनीत आणि रवी राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *