महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२६ एप्रिल । राज्यात पावसासाठी हवामान पोषक असले तरी काही भागात उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. परिणामी कमाल तापमानातील चढ-उतार सुरू आहे. राज्यात मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा ही हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. सोमवारी राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली होती. मध्य महाराष्ट्रातील काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट पाहायला मिळाली.
दरम्यान पुढील चार दिवस राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान हे २ ते ४ अंशांनी वाढू शकेल. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार येत्या गुरुवारपर्यंत (ता. २८) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पाऊस कायम राहणार असून मध्य महाराष्ट्रात २६ ते २९ एप्रिल या कालावधित उष्णतेची लाट येऊ शकते. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच मंगळवारी (ता. २६) लातूर, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
विदर्भात पारा ४५ अंश
सोमवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद वर्धा येथे ४५ अंश सेल्सिअस इतकी झाली. अकोला, चंद्रपूर, ब्रम्हपुरी येथे ४४ अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदले गेले. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात कमाल तापमान हे ४० ते ४२ अंशादरम्यान होते. मात्र आता पारा पुन्हा वाढू लागला असून विदर्भात बुधवारपासून (ता. २७) उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
सर्वाधिक तापमान
वर्धा ४५
ब्रम्हपुरी ४४.९
चंद्रपूर ४४.६
अकोला ४४