महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२६ एप्रिल । राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या पेपर तपासणीचे कामकाज राज्यात सुरळीत सुरू आहे. कमी विद्यार्थी संख्या असलेल्या काही विषयांच्या पेपर तपासणीचे काम हे अंतिम टप्प्यावर पोचले आहे. इतरही पेपर तपासणी ही वेगाने सुरू असल्याने दहावी-बारावीच्या परीक्षेचे निकाल वेळेवर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Tenth And Twelve Standard results may be in time)
दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा (Examinations) सुरू होताच राज्यातील (Maharashtra) शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता; तर कायम विनाअनुदानित शाळा संघटनेच्या असंख्य प्रतिनिधींनी दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे न तपासता ते परत केले होते. काहींनी ते सोशल मीडियावरही व्हायरल केले होते. यामुळे या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात हेाती.
मात्र राज्य शिक्षण मंडळाने नियोजन केल्याने या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम सुळीत सुरळीत सुरु असून बारावीचा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा जूनच्या अखेरच्या आठवड्यापूर्वीच निकाल जाहीर होण्याची मंडळातील वरिष्ठ अधिकारी सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
कोरोना आणि त्याचा एकूणच प्रादुर्भाव ओसरला असल्याने राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेतल्या होत्या. त्याविरोधात काही पालकांनी न्यायालयातही धाव घेतली हेाती; परंतु न्यायालयानेही मंडळाच्या भूमिकेवर निर्णय दिल्याने राज्यात या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आणि सुरळीत पार पडल्या होत्या.
दहावीला १६ लाख….
दहावीच्या परीक्षेला यंदा १५ मार्चपासून सुरुवात झाली होती. या परीक्षेला राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतून पाच हजार ५० मुख्य आणि १६ हजार ३३५ उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेला तब्बल १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थी बसले होते.
बारावीला १४ लाख…
बारावीची परीक्षा ही ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. त्या परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी बसले होते, यात मुंबई विभागातील तीन लाख ३५ हजार २० विद्यार्थ्यांचा समावेश होता.