महाराष्ट्रात पुन्हा मास्क ? पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर मास्क सक्तीच्या निर्णयाची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल । देशातील करोना रुग्णांची संख्या मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये मागील काही दिवसांमध्ये दिवसाला एक हजारहून अधिक रुग्ण आढळून आलेत. मुंबईमध्ये रविवारी विक्रमी १४४ रुग्ण आढळून आले. मुंबईतही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा बैठक बोलवली आहे. या बैठकीमधील चर्चेनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीमध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सहभागी होण्यास सांगण्यात आलंय.

राज्यात पुन्हा चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मुखपट्टी वापराची सक्ती लागू करण्याची सूचना डॉक्टरांच्या कृतीगटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना परिस्थितीबाबत आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविली आहे. त्यानंतर संबंधितांशी विचारविनिमय करून राज्य सरकार मास्क सक्तीबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

 

देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीही या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. या शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि या दोन्ही मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये असतील. या बैठकीमध्ये करोना रुग्णसंख्येची वाढ रोखण्यासाठी राज्यांना निर्देश देण्याबरोबरच काही धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

या राज्यांनी पुन्हा केलीय मास्क सक्ती…
रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा दिल्ली तसंच शेजारील राज्यं हरियाणामधील चार आणि उत्तर प्रदेशमधील पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे.

मास्कबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात?
भारतीय वैद्यकीय संशोधक संस्थेच्या साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर ललित कांत यांनी मास्क सक्ती काढल्यानंतर रुग्णसंख्या वाढू शकते असं म्हटलंय. “लोकांनी मास्क काढल्यानंतर रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होणं अपेक्षित होतं. ही रुग्णसंख्या कमी जास्त होत राहणार आहे. मात्र गंभीर आजार आणि होणारे मृत्यू यासंबंधीची आकडेवारी जास्त महत्वाची आहे,” असं कांत म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *