महाराष्ट्र 24 – प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे- पिंपरी चिंचवड :- आगामी निवडणुकीत मित्रपक्षांनी व्यवहार्य भूमिका घेतली, तरच एकत्र लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे. मात्र, ताकदीपेक्षा अवास्तव जागांची मागणी त्यांनी केली, तर मात्र राष्ट्रवादीला एकला चलो रे ठरवावे लागेल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये शंभर नगरसेवक निवडून दिले, तर पाण्यासह शहराचे सर्व प्रश्न मार्गी लावणार, असा शब्द देतो. कारण, स्टंटबाजी माझ्या स्वभावात नाही, असे ते म्हणाले. यानिमित्ताने त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. गेल्या अडीच वर्षापासून पिंपरी-चिंचवडमध्येदिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. हा धागा पकडून राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या, तर पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणी देणार, हा माझा शब्द आहे, असे अजितदादा म्हणाले.
या पाणीप्रश्नाला पालिकेतील माजी सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. कारण, राज्य सरकारने शहरासाठी भामा आसखेड व आंद्रा धरणातून मंजूर केलेले २६७ एमएलडी पाणी त्यांना गेल्या पाच वर्षात आणता आले नाही. कारण त्यांच्या अंगातच पाणी नाही, ते काय दररोज पाणी देणार, अशी आव्हान वजा विचारणा त्यांनी केली.
फक्त जास्त कमिशन मिळणारी कुत्र्यांच्या
नसबंदीसारखीच कामे करण्यातच त्यांना रस
असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. त्यांनाच नाही,
तर मित्रपक्षांसह इतर कुठल्याच पक्षाच्या राष्ट्रीय व
राज्य स्तरावरील नेत्यांना पिंपरी-चिंचवडविषयी
आपुलकी नाही. शहरासाठी त्यांच्याकडे वेळ नाही,असा दावाही त्यांनी केला. म्हणून राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता देण्याची साद त्यांनी घातली. ती दिली, तर गेल्या पाच वर्षातील कामाचा बॅकलॉग भरून तर काढूच, शिवाय. दुप्पट वेगाने विकासकामे करू,असे आश्वासन त्यांनी दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०१७ ला झालेल्या पराभवाची बोच अजित पवारांना अद्याप असल्याचे दिसून आले. मोदी लाटेचा फटका त्यावेळी बसला. पण, कामामागे जनता उभी न राहिल्यांची खंतही त्यांनी बोलून दाखवली.