शिवराज्याभिषेक सोहळा : रायगड किल्ल्यावर भव्य असा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । आज रायगड किल्ल्यावर भव्य असा 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. औत्सुक्याने आणि आदराने हा सोहळा जगभर पाहिला जातो. या सोहळ्याचे ऐतिहासिक मूल्य पाहता शिस्तबद्धतेच्या काळजीसह प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक असा हा सोहळा संपन्न होणार आहे.कोरोनामुळे गेली दोन वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ‘शिवराय मनामनात – शिवराज्याभिषेक घराघरांत’ ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात साजरा होत आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या सूचनेनुसार या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.आकर्षक विद्युत रोषणाईने रायगड उजळून निघणार आहे. गडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे अन्नछत्र उभारण्यासह राजसदर फुलांनी सजविण्यात आले आहे. भवानी पेठ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे.

गडावर जाण्यासाठी आणि उतरण्यासाठी एकेरी मार्ग करण्यात आले आहे. रोप वे साठी दिव्यांग आणि वृद्धांना प्राधान्य देण्यात आले आहे. तर शिवभक्तांना गडावर पायी येण्याचे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीने केले आहे.

गडावरील तलावांच्या स्वच्छतेमुळे मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. शिवप्रेमींच्या राहण्यासाठी तात्पुरते तंबू उभारणे व गड स्वछतेसाठी एक हजार स्वयंसेवक कार्यरत असून रायगडावरील प्रत्येक ऐतिहासिक क्षण टिपून तो जगभर पोहोचवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीने दिली आहे.

आज सकाळी ध्वजपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. युवराज संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या हस्ते दरबार पुरोहितांच्या मंत्रघोषात शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक होईल. शिवरायांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा कार्यक्रमाने सांगता होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *