महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । सर्वसामान्य नागरिकांच्या पुंजीवर डल्ला मारण्यासाठी सायबरचोर रोज नवनवीन जाळे फेकत आहेत. झटपट कर्ज देणारी ॲप, बक्षीस मिळाल्याचे अमिष दाखवणे, खोट्या कस्टमर केअरवरून थेट बँकेच्या खात्यातून पैसे काढून घेतले जात आहेत. आता तर थकीत वीज बिल न भरलेल्या ग्राहकांना वीज जोडणी तोडण्याची भीती दाखवून फसविण्याच्या प्रकार घडू लागले आहेत. मलबार हिल, पवई, अंधेरी, दहिसर, भांडुप, मुलुंड या ठिकाणच्या वीजग्राहकांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेले जगमोहन हे अंधेरी पश्चिमेला कुटुंबासह वास्तव्यास आहेत. जगमोहन यांच्या मोबाइल क्रमांकावर एक संदेश आला आणि त्यामध्ये आपले वीज बिल थकीत असून ते भरले नाही तर रात्री साडेदहा वाजता आपल्या घरातील विजेचे कनेक्शन कापण्यात येईल, असे संदेशात नमूद करण्यात आले होते. जगमोहन यांनी शहानिशा करण्यासाठी संदेशातील दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने विद्युत कंपनीतून बोलत असल्याचे सांगून वीज बिल ऑनलाइन भरण्यासाठी ॲनी डेस्क ॲप डाउनलोड करायला असे सांगितले. जगमोहन यांनी ॲनी डेस्क ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या प्रतिनिधीने जगमोहन यांना क्रेडिट कार्डवरून ११ रुपये पाठविण्यास सांगितले. जगमोहन यांनी क्रेडिट कार्डाचा तपशील भरल्यानंतर आलेल्या ओटीपी मोबाइलमध्ये टाइप करून ११ रुपये पाठविले. काही वेळातच त्यांना ९९,९९९ रुपये दोनदा वजा झाल्याचा संदेश आला. याबाबत हटकण्यापूर्वीच समोरील व्यक्तीने फोन कट केला.
… हे लक्षात असू द्या
– मोबाइलवर वीज बिलासाठी आलेल्या संदेशाला प्रतिसाद देऊ नये.
– वीज बिल थकीत आहे का, याची शहानिशा करावी.
– संदेशातील लिंकवर जाऊन ॲप डाउनलोड करणे टाळावे.
– ॲनी डेस्क, क्विक सपोर्ट, टीम व्ह्यूअर हे ॲप डाउनलोड करून मोबाइलचा ताबा अन्य कुणास देऊ नये.
– वीज बिलाबाबत कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळ अथवा बिलावरील क्रमांकावर चौकशी करावी
– कंपनीचे जवळील कार्यालय अथवा बिल भरणा केंद्रात जाऊनही खातरजमा करता येते.
– ऑनलाइन व्यवहार करताना एखाद्या परिचयातील माहितगाराची मदत घ्यावी.
फसवणूक झाल्यास…
– वीज बिलासंदर्भात संदेश अथवा फोन आल्यास पोलिसांत तक्रार करा.
– पैसे भलत्याच ठिकाणी ऑनलाइन ट्रान्सफर केल्याचे लक्षात येताच बँकेशी तत्काळ संपर्क साधा.
– क्रेडिट किंवा डेबिट कार्डचे व्यवहार त्वरित बंद करण्यास सांगा.
– दिशाभूल करून पैसे काढल्यास जवळील पोलिस ठाणे किंवा सायबर पोलिसांना माहिती द्या.