महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० जून । महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (10 जून) मतदान पार पडणार आहे. सहाव्या जागेसाठी चुरस होण्याची शक्यता असल्याने एक एक महत्त्वाचं आहे. आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये यासाठी राजकीय पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप राज्यसभेच्या मतदानासाठी मुंबईत येणार असल्याचं निश्चित झालं आहे. ते सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईला रवाना झाले. लक्ष्मण जगताप महामार्गाद्वारे अॅम्ब्युलन्समधून मुंबई गाठणार आहेत. दरम्यान आजारी असल्याने लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी मुंबईत आणण्यासाठी रस्तेमार्गासह एअर लिफ्टचीही सुविधा तयार ठेवण्यात आली होती.
आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून आजाराने त्रस्त आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जूनला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. अशा परिस्थितीत ते मतदानाला मुंबईला गेले तर ते त्यांच्या प्रकृतीसाठी जिकिरीचं ठरेल. त्यामुळे कुटुंबीय मतदानासाठी त्यांना मुंबईला पाठवण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पक्षाचा आग्रह असल्याने अखेर ते मतदानाला जाणार हे निश्चित झालं आहे.
आमदार लक्ष्मण जगताप हे महामार्गाद्वारेच मुंबईला मतदानासाठी जातील. अॅम्ब्युलन्समधूनच ते प्रवास करतील. एअर अॅम्ब्युलन्सही तयार ठेवलेली होती, मात्र हवामानात वारंवार बदल होत असल्याने डॉक्टरांनी महामार्गाने जाण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी दिली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील सहा जागांसाठी मतदान पार पडले. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 पासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. विधानसभेचे 288 सदस्य आहेत. परंतु एका आमदाराचे निधन आणि 2 आमदार कोठडीत असल्याने एकूण 285 मतदार राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान करणार आहेत.